निरा:पुरंदर | विजेच्या धक्क्याने गाभण गाईचा मृत्यू; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान, एमएसईबीकडे नुकसान भरपाई ची मागणी..!

 

                पुरंदर रिपोर्टर Live 

पुरंदर : निरा ( दगडेवस्ती ) -

                           पुरंदर तालुक्यातील नीरा परिसरात विजेच्या धक्क्याने एका गाभण गाईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एमएसईबीच्या निष्काळजी कारभारामुळे शेतकरी लाला नात्याबा दगडे यांची सुमारे दीड लाख रुपये किमतीची सहा महिन्यांची गाभण गाय जागीच ठार झाली.

                   ही घटना नीरा नजीक दगडेवस्ती येथे बारामती कॉर्नरजवळील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयाजवळ मोकळ्या जागेत घडली. शेतकरी लाला दगडे ( राहणार दगडेवस्ती ) आज शुक्रवार दि.(१०) नेहमीप्रमाणे आपल्या गाईंसह चारण्यासाठी गेले असताना, एमएसईबीच्या पोलजवळ अनेक दिवसांपासून पडलेल्या मोकळ्या विद्युत तारांमध्ये गाईचा पाय अडकला. तीव्र विजेच्या धक्क्याने गाय घटनास्थळीच कोसळून मृत्यूमुखी पडली.


दुर्दैव टळलं हेच नशीब…!


घटनास्थळी शेतकऱ्याच्या आणखी चार गाई उपस्थित होत्या. विजेचा झटका बसताच त्या दूर गेल्याने मोठा अनर्थ टळला. शेतकरी दगडे यांनी प्रसंगावधान राखत इतर गाई दूर नेऊन मोठे नुकसान टळवले.


निष्काळजीपणाचा परिणाम..?

         स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात एमएसईबीच्या निष्काळजीपणामुळे वायर अनेक दिवसांपासून जमिनीवर पडलेल्या होत्या. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही एमएसईबीने कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप केला जात आहे.


पशुपालक शेतकऱ्याने शासनाकडे तात्काळ नुकसानभरपाईची मागणी केली आहे…विजेच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होऊ शकते, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments